शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ; डेंग्यू, हिवताप प्रतिबंधाबाबत जनजागृती; स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन
बुलढाणा, दि. 01 (जिमाका) : जानेफळ येथील शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत दि. 30 सप्टेंबर
रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूरज ठाकरे
व वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोंळकी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने
ही तपासणी केली.
तपासणीदरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची
सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या विविध
तपासण्या करण्यात आल्या. तपासणीमध्ये आढळून आलेल्या बाबींची नोंद घेऊन विद्यार्थ्यांच्या
आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता, वैयक्तिक
आरोग्य, संतुलित आहार तसेच विविध आजारांपासून बचावाच्या उपाययोजनांबाबत आरोग्यविषयक
मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू व हिवतापापासून बचाव
करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. परिसरात स्वच्छता राखणे,
पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे तसेच आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य
केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित
तपासणी व आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास आजारांचे वेळीच निदान आणि प्रतिबंध
करणे शक्य होते. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना
मोलाचे मार्गदर्शन केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित
करण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक तसेच संबंधित कर्मचारी
उपस्थित होते.
00000


Comments
Post a Comment