खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत शुटिंग, सायकलिंग व अॅथलेटिक्स निवड चाचण्या आयोजित

 


बुलढाणा, दि. 5 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर (राज्य निपुणता केंद्र) अंतर्गत शुटिंग, सायकलिंग व अॅथलेटिक्स या खेळांच्या निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत.

दि. १४ डिसेंबर २०२० रोजी मंजूर करण्यात आलेल्या या केंद्राअंतर्गत पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे अॅथलेटिक्स, शुटिंग आणि सायकलिंग या खेळांचे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

निवड चाचण्या अॅथलेटिक्स व सायकलिंगसाठी दि. ११ व १२ मे २०२६ रोजी तर शुटिंगसाठी दि. १८ व १९ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता घेण्यात येणार आहेत. या निवड प्रक्रियेसाठी पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

निवड प्रक्रियेनुसार अॅथलेटिक्समध्ये १६ खेळाडू (०७ मुले व ०९ मुली), सायकलिंगमध्ये ०१ मुलगी आणि शुटिंगमध्ये १० खेळाडू (०६ मुले व ०४ मुली) यांची निवड करण्यात येणार आहे.

संबंधित खेळ प्रकारांमध्ये तज्ज्ञ समितीमार्फत खेळाडूंची चाचणी घेऊन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.

निवड प्रक्रियेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत :

·         अॅथलेटिक्स व सायकलिंग खेळासाठी राज्यस्तरीय प्राविण्यप्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग/प्राविण्य मिळविलेले खेळाडूच पात्र राहतील.

·         खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत प्रवेशासाठी दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी निश्चित मानके लागू राहतील.

·         इच्छुक खेळाडूंनी परिशिष्ट-ब व क नुसार माहिती अर्ज दि. ०८ मे २०२६ पर्यंत kiscepune@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या