कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन

 

 

बुलढाणा, दि. 18 (जिमाका): सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे.

            शासन निर्णय क्रमांक जमीन-२०१५/प्र.क्र.६४/अजाक, दिनांक १४ ऑगस्ट २०१८ अन्वये ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ४ एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन कमाल प्रतिएकर ५ लाख रुपये किंमतीपर्यंत किंवा २ एकर ओलीताखालील (बागायती) जमीन कमाल प्रतिएकर ८ लाख रुपये किंमतीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक असून तो दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन असावा. लाभार्थ्यांचे वय किमान १८ वर्षे व कमाल ६० वर्षे असावे. लाभार्थी निवडीत दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन परित्यक्ता महिला, विधवा महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्तांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शासन निर्णय दिनांक १४ मार्च २०१८ नुसार जिल्हास्तरीय समितीमार्फत जमीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रचलित रेडीरेकनर दरानुसार जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाणार असून आवश्यकतेनुसार रेडीरेकनर दरापेक्षा अधिक किंमत देण्याची तरतूदही शासनाने केली आहे. मात्र, जिरायती जमिनीसाठी प्रतिएकर ५ लाख रुपये व बागायती जमिनीसाठी प्रतिएकर ८ लाख रुपये ही कमाल मर्यादा राहणार आहे.

शासन मान्य दरानुसार जमीन शासनास विक्री करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, बुलढाणा यांच्या कार्यालयात दि. १२ जून २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित