माटरगाव येथे उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

बुलढाणा, दि. 14 (जिमाका) :  महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार शेगाव तालुक्यातील माटरगाव मंडळात शुक्रवार, दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता जि.प. हायस्कूल, माटरगाव बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांना महसूल, कृषी, आरोग्य, पुरवठा, निवडणूक व विविध शासकीय योजनांशी संबंधित सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरात ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, विविध फेरफार नोंदी, जिवंत ७/१२ अंतर्गत नोंदी, विस्तारित जिवंत ७/१२ योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, सलोखा योजना तसेच पी.एम. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे लँड सीडिंग करण्यात येणार आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी, फेरफार अदालत, अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक तयार करणे, ई-हक्क प्रणाली अंतर्गत अर्ज स्वीकारणे, ई-पीक पाहणी, ई-चावडीद्वारे जमीन महसूल वसुली आदी सेवा देण्यात येतील.

शिबिरात नवीन आधार नोंदणी व आधार अद्ययावत करणे, उत्पन्न, जात, नॉन-क्रीमीलेयर, राष्ट्रीयत्व, वय व अधिवास प्रमाणपत्रांसाठी ई-अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच संजय गांधी योजना, रेशनकार्ड संदर्भातील अर्ज, नवीन मतदान ओळखपत्र नोंदणी व दुरुस्ती, आधार-मतदान जोडणी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

आरोग्य विभागामार्फत आभा कार्ड, डिजिटल हेल्थ कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना संदर्भातील अर्ज प्रक्रिया करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारणे, शेततळे योजना, पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजनांचे अर्ज तसेच जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या शिबिरांचा माटरगाव मंडळातील सर्व नागरिकांनी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन शेगाव तहसीलदार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या