एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 19 (जिमाका): भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या खरीप हंगामात एल-निनो (El-Nino) च्या प्रभावामुळे सरासरी पावसाच्या तुलनेत ७ ते ८ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान अंदाजाचा विचार करता, शेतकऱ्यांनी मान्सूनच्या सुरुवातीच्या पहिल्या-दुसऱ्या पावसानंतर लगेचच पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत परिसरात किमान ७५ ते १०० मि.मी. इतका समाधानकारक पाऊस होत नाही आणि जमिनीत किमान ६ ते ७ इंच खोलपर्यंत पुरेशी ओल जात नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. कमी पावसावर केलेली पेरणी उगवण क्षमतेवर परिणाम करते आणि पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

कृषी विभागाने यंदाच्या हंगामात खालील गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे, ज्याचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने करावा. शेतकऱ्यांनी जमिनीच्या उताराला आडवी पेरणी करावी, ज्यामुळे मातीची धूप थांबेल आणि पाणी जमिनीत जिरेल तसेच शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राचा वापर करून पेरणी करावी. कमी पावसाच्या परिस्थितीत सऱ्यांमध्ये ओलावा टिकून राहत असल्यामुळे पाऊस लांबला तरी पिके सुकत नाहीत. जास्त पाऊस झाल्यास सऱ्यांमधून जास्तीचे पाणी पिकाला इजा न पोहोचवता सुरक्षितपणे बाहेर निघून जाते. सोयाबीन आणि कापूस पिकासाठी हे वरदान मानले जाते. यामुळे कमी पावसात ओलावा टिकून राहतो आणि अति पावसात पाण्याचा निचरा होतो. पाणी टंचाई परिस्थितीत फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी झाडांच्या मुळांभोवती जैविक आच्छादन (Mulching) करणे, 'अँटी-ट्रान्सपिरंट' (बाष्पीभवन रोखणारी) औषधांची फवारणी करणे आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी कुंपण घालणे तसेच उपलब्ध पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्यासाठी ठिबक (Drip) आणि तुषार (Sprinkler) सिंचन पद्धतीचा वापर करावा. ठिबक व तुषार सिंचनाच्या अनुदानासाठी महाडीबीटी व नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प योजने अंतर्गत अर्ज करावेत.

     एप्रिल ते जून दरम्यान शेततळे तयार करावेत पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते शेतातीलच एका भागात खोदलेल्या तलावात साठवले जाईल.पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्यास (Dry Spell) किंवा ऐन पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (उदा. फुलोरा किंवा शेंगा धरताना) या साठवलेल्या पाण्यातून पिकांना जीवदान देणारे पाणी (संरक्षित सिंचन) देता येते. शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण करून जमिनीच्या सुपीकता निर्देशांकावर आधारित (Soil Health Card नुसार) खतांचा योग्य वापर करावा. तसेच नैसर्गिक निविष्ठा गांडूळ खत, जीवामृत आणि घनजीवामृत,जिवाणू खते यांचा पर्यायी खते म्हणून वापर करावा.जेणेकरून शेतकऱ्यांची पैशाची बचत होऊन जमीन आरोग्य सुधारेल. जेव्हा पावसाची अनिश्चितता असते, तेव्हा एकाच एका पिकावर अवलंबून राहणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच 'आंतरपीक पद्धती' (Intercropping) अवलंब करावा जसे सोयाबीन + तूर ,कापूस +मुग इत्यादि. त्यामुळे शेतकऱ्यांचे एका पिकावर अवलंबत्व राहणार नाही व आर्थिक नुकसान होणार नाही .

     वरील बाबींचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. अधिक माहितीसाठी  कृषि विभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

000000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित