जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; 18 लाख 36 हजार लिटर इंधन दाखल; अफवांवर विश्वास ठेवू नका, अनावश्यक खरेदी टाळा : जिल्हाधिकारी यांचे आवाहन



बुलढाणा, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दि. 29 मे 2026 रोजी विविध ऑईल कंपन्यांकडून जिल्ह्याला एकूण 18 लाख 36 हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवू नये आणि गरजेपुरतेच पेट्रोल-डिझेल खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारत पेट्रोलियम (BPCL) कडून 1 लाख 68 हजार लिटर पेट्रोल व 5 लाख 88 हजार लिटर डिझेल, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) कडून 39 हजार लिटर पेट्रोल व 31 हजार लिटर डिझेल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) कडून 4 लाख 90 हजार लिटर पेट्रोल व 5 लाख 20 हजार लिटर डिझेल प्राप्त झाले आहे, असे एकूण जिल्ह्याला पेट्रोल 6 लाख 97 हजार तर डिझेल 11 लाख 39 हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. पुढील काळातही दररोज इंधन साठा जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गॅस सिलेंडरबाबतही जिल्ह्यात कोणतीही कमतरता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे नियमित 4 लाख 63 हजार 494 ग्राहक असून उज्वला योजनेंतर्गत 2 लाख 5 हजार 715 ग्राहकांना सेवा दिली जात आहे. दररोज सुमारे 8 हजार 298 गॅस सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून 18 हजार 118 सिलेंडरचा साठा राखीव आहे. कंपन्यांकडून दररोज याच पद्धतीने इंधनाचा पुरवठा होणार असल्याचे पुरवठा शाखेने सांगितले आहे.

जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या तसेच पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल सुरळीतपणे उपलब्ध होत असून गर्दीचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. इंधन वितरण सुरळीत राहावे यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या