लाडकी बहीण योजनेबाबत अफवा:जिल्हा कार्यालयात गर्दी टाळा; महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 20 (जिमाका): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर आणि काही माध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न करू शकलेल्या महिलांना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याची मुभा देण्यात आल्याची बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारचे कोणतेही निर्देश शासनस्तरावरून प्राप्त झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या अफवांमुळे जिल्हा, शहर व तालुका स्तरावरील महिला व बाल विकास कार्यालयांमध्ये महिलांची अनावश्यक गर्दी होत असून प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च 2026 चा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार असून महिलांनी संयम राखावा. सोशल मीडियावरील अथवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये.

दरम्यान, मार्च आणि एप्रिल 2026 या महिन्यांचे हप्ते ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. याबाबत शासनस्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू असून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने दिली आहे. मागील सहा महिन्यांपासून लाभ न मिळालेल्या महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारची अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या