अजंठा ॲग्रो सर्व्हिसेस सेंटरवर पोलिसांची कारवाई; खतांचा काळाबाजार आणि फसवणूक केल्याप्रप्रकरणी गुन्हा दाखल!

 


बुलढाणा, दि. 20 (जिमाका): शेतकऱ्यांच्या नावे आधार कार्डचा गैरवापर करून ऑनलाईन ई-पॉस (E-POS) प्रणालीवर खतांची बनावट विक्री दाखवणे, अनुदानित युरिया खताचा काळाबाजार करणे आणि परवाना संपलेले तसेच विनापरवाना अनधिकृत कीटकनाशके/खते बाळगल्याप्रकरणी मेहकर येथील 'अजंठा ॲग्रो सर्व्हिसेस सेंटर' चे मालक महेश शामसुंदर गट्टाणी यांच्याविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

उकळी (ता. मेहकर) येथील शेतकरी नयन विश्वासराव खरात यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. त्यांनी अजंठा ॲग्रो सर्व्हिस सेंटरमधून सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) खताच्या ६ बॅगा खरेदी केल्या होत्या. परंतु, त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून ई-पॉस (E-POS) मशीनवर त्यांच्या नावे डी.ए.पी. (DAP) च्या ८ बॅगा आणि २०:२०:०:१३ खताच्या १५ बॅगा खरेदी केल्याचा बनावट मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला.

या गंभीर तक्रारीची दखल घेत दि. १६ मे २०२६ रोजी जिल्हा भरारी पथकाचे अध्यक्ष व मोहीम अधिकारी  प्रमोद गायके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत, तालुका कृषी अधिकारी व खत निरीक्षक उद्धव शामराव काळे आणि कृषी अधिकारी संदेश गायकवाड यांच्या पथकाने अजंठा ॲग्रो सर्व्हिसेस सेंटरची प्रत्यक्ष तपासणी केली.

तपासणीदरम्यान शेतकरी नयन खरात यांच्या नावे ई-पॉस प्रणालीमध्ये खतांची बनावट विक्री नोंदवून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. दुकानात तपासणी केली असता 'BIO-R303 Plus' आणि 'Isabion' सारख्या नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांची परवाना वैधता संपलेली आढळली. तसेच 'Hunter', 'QUICK' आणि 'MJ Maharaja Polyhalite' या खत व औषधांचे विक्रेत्याकडे कोणतेही वैध परवाने मिळून आले नाहीत.

 ई-पॉस मशीनवरील ऑनलाईन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यात प्रचंड तफावत आढळली. PPL कंपनीचा युरिया ऑनलाईन २१९ बॅग दाखवत असताना प्रत्यक्षात २७६ बॅग उपलब्ध होता. तर NFL कंपनीचा युरिया ऑनलाईन 'शून्य' दाखवत असताना प्रत्यक्षात गोदामात ६९ बॅग आढळून आला. साठा रजिस्टर देखील अपूर्ण होते. ऑनलाईन ई-पॉस मशीनवर युरिया खताची शेतकऱ्यांना फक्त आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने विक्री दाखवून, प्रत्यक्षात तो अनुदानित युरिया अकृषक कामासाठी अवैधरित्या विकून शासकीय अनुदान लाटण्याचा मोठा काळाबाजार याठिकाणी सुरू असल्याचे उघड झाले.

याप्रकरणी खत निरीक्षक तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उद्धव शामराव काळे यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी आरोपी महेश शामसुंदर गट्टाणी (प्रो.प्रा. अजंठा ॲग्रो सर्व्हिसेस सेंटर, मेहकर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६, ३३६(३) सह रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५, खत वाहतूक व नियंत्रण आदेश १९७३ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा (रजि. नं. ०३४८/२०२६) दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करत असल्याची माहिती कृषि विभागाव्दारे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी