ड्रोन उडवण्याचे दर्जेदार प्रशिक्षण मोफत; अधिकृत परवाना घेऊन सुरू करा व्यवसाय खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी शासनाच्या अमृत संस्थेची विशेष योजना
बुलढाणा, दि. 15 (जिमाका): शेतीपासून
फोटोग्राफी, भूमापन, पीक सर्वेक्षण ते सरकारी प्रकल्पांच्या निरीक्षणापर्यंत विविध
क्षेत्रांत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये
करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आता राज्य शासनाच्या “अमृत ड्रोन मिशन” अंतर्गत उपलब्ध झाली असून, पात्र युवकांना मोफत निवासी
ड्रोन पायलट प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत
ड्रोन ऑपरेटर परवानाही दिला जातो.
महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या रूपाने कार्यरत असलेली
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांतील युवकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम
राबवते. त्याचाच भाग म्हणून “अमृत ड्रोन मिशन” ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत दिला
जाणारा 10 दिवसांचा निवासी प्रशिक्षण कोर्स अत्यंत दर्जेदार असून, सामान्यतः यासाठी
लाखो रुपये खर्च करावे लागतात. मात्र लक्ष्यित घटकांतील युवकांना हे प्रशिक्षण पूर्णतः
मोफत दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही संस्थेकडूनच केली
जाते.
या प्रशिक्षणामध्ये शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन, एरियल फोटोग्राफी,
व्हिडिओग्राफी, आपत्ती व्यवस्थापन, ड्रोन हाताळणी, देखभाल व ‘डीजीसीए’च्या सुरक्षित
उड्डाण नियमांचे सखोल मार्गदर्शन दिले जाते. प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर विशेष भर असल्याने
युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.
आजपर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला
असून, अनेकांनी ड्रोन सेवांद्वारे उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे. अमृत संस्थेच्या
प्रशिक्षणाच्या गुणवत्तेची दखल घेत गोवा शासनानेही आपल्या अधिकाऱ्यांना याच संस्थेमार्फत
प्रशिक्षण दिले आहे.
पात्रता निकष : उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय १८ ते ५५
वर्षे दरम्यान असावे, किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य, वैद्यकीय
फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक. ही योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी
असून, ब्राह्मण, कायस्थ, वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, सिंधी, बंगाली, गुजराथी, ठाकूर,
जाट, लोहाना, भूमिहार आदी 25 जातींचा त्यात समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर
लाभार्थ्यांना ड्रोन खरेदीसाठी अमृत संस्थेच्या कर्ज व्याज परतावा योजनेचाही लाभ मिळू
शकतो.
अर्ज प्रक्रिया : अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून इच्छुकांनी
अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिगणेश कमाणी जिल्हा
व्यवस्थापक, अमृत बुलढाणा मो. 9112227637/8308998922 किंवा ३०५, तिसरा मजला, बुलढाणा
प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा येथे संपर्क साधावा.
000000
Comments
Post a Comment