ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

 


ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

 

बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :  भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. या हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे, या दृष्टीने केंद्र शासनाने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे.

 

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम्  या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.

 

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधीत संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू कोणाला स्वखुशीने ही हस्तलिखिते राज्य शासनाकडे सुपूर्द करावयाची झाल्यास शासन ती स्वीकारेल.

 

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत:

          कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर - क्लस्टर केंद्र

          भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे - क्लस्टर केंद्र

          आनंद आश्रम संस्थान, पुणे - स्वतंत्र केंद्र

          भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे - स्वतंत्र केंद्र

महाराष्ट्रासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेत. तर अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था, तथा अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

 

या सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत Gyan Bharatam हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, तसेच एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

 

ज्ञानभारतम् मोहिमेकरीता जिल्हानिहाय नेमणूक केलेल्या नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकाऱ्यांची यादी व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे : अमरावती व अकोला जिल्ह्याकरीता श्री. दीपक पाटील (मो.9423102051) व डॉ. प्रशांत सोनवणे (मो.8600751897), वाशिम जिल्ह्यासाठी श्री. गजानन शेळके (मो.7767802263) व श्याम बोरकर (मो.9405500812), बुलडाणाकरीता गजानन शेळके व डॉ. प्रशांत सोनवणे तर यवतमाळ जिल्ह्यासाठी गीता सानगरवार (मो.9370150911) व श्याम बोरकर आदी अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील.

 

नागरिकांकडे अथवा संस्था, मंदिरे, ग्रंथालये किंवा खासगी संग्रहात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असल्यास, त्याची माहिती ‘ग्यान भारतम् या मोबाईल अॅपवर अपलोड करावीत. या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन करण्याच्या कार्यात नागरिक, संस्था आणि संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना