विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; कायद्यातील तरतुदीनुसार परवाना घेणे बंधनकारक

 


 

बुलढाणा दि.19 (जिमाका): पणन, खाजगी बाजार, शेतकरी-ग्राहक बाजार तसेच ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठी परवाने देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यापाऱ्यांनी, संस्थांनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी किंवा शेतमाल व्यापाराशी संबंधित इतर घटकांनी आवश्यक परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करू नये. अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्यात शेतमाल खरेदी-विक्रीचे विनियमन करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व नियम 1967 लागू असून, या कायद्याअंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेचे नियमन करण्यात येते. मात्र, राज्यातील विविध भागांमध्ये अनेक व्यापारी, काही संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून कोणताही परवाना न घेता मोठ्या प्रमाणावर शेतमाल खरेदी-विक्री केली जात असल्याच्या तक्रारी संबंधित कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधितांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. तरीदेखील काही व्यापारी व संस्था विनापरवाना व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने दि. 5 जुलै 2016 रोजी राजपत्र अध्यादेश क्रमांक 15 प्रसिद्ध केला असून, त्याच्या अंमलबजावणीबाबतच्या सूचना दि. 8 जुलै 2016 रोजी जारी करण्यात आल्या होत्या. तसेच दि. 31 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासन राजपत्रान्वये मुख्य अधिनियमाच्या कलम 6 मधील पोटकलम 2 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार, कलम 5 (ड) मध्ये नमूद केलेल्या तरतुदींप्रमाणेच संबंधितांना बाजार समितीकडून परवाना घेणे आवश्यक राहणार आहे. मात्र, अशा परवानाधारकांकडून कोणतेही बाजार शुल्क आकारले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या