चिखली तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र तात्काळ अद्यावत करावे : तहसिलदार विजय सवडे यांचे आवाहन
बुलढाणा दि.8 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी
निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना
आता Beneficiary Satyapan App द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital
Life Certificate) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासन निर्णय क्रमांक
केपुयो-2026/प्र.क्र.42/विसयो दिनांक ७ मे २०२६ नुसार लाभार्थ्यांनी स्वतः किंवा
नातेवाईकांच्या मदतीने तसेच ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्राम महसूल सेवक
(कोतवाल), ग्रामपंचायत कर्मचारी, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा
नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करता येणार
आहे.
हयात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी लाभार्थ्यांनी
मोबाईलवरील गुगल प्ले-स्टोअरमधून Beneficiary Satyapan App
आणि Aadhar Face RD हे ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर
मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाद्वारे नोंदणी करून संबंधित योजनेची निवड करावी
लागेल. फेस कॅप्चर किंवा बोटांचे ठसे यांच्या माध्यमातून डिजिटल हयात प्रमाणपत्र
तयार करता येणार आहे.
चिखली तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी
उपलब्ध सुविधांचा वापर करून तात्काळ हयात प्रमाणपत्र अद्यावत करून घ्यावे, असे
आवाहन तहसिलदार श्री. विजय सवडे यांनी केले आहे. तसेच यासंदर्भात कोणतीही अडचण
किंवा शंका असल्यास संबंधित गावातील तलाठी, कोतवाल किंवा तहसिल कार्यालय, चिखली
येथील संगायो शाखेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
शासन निर्णयानुसार हयात प्रमाणपत्र सादर न
केल्यास जून महिन्यापासून संबंधित लाभ बंद करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी
याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment