चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

 


चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव

केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

 

बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :  महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात, राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक एकूण 15 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला.

 

या सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या.

 

विदर्भातील चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयम यांनी गेल्या 24 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अत्यंत समर्पित सेवा दिली आहे. विशेषतः नक्षल प्रभावित आणि आदिवासी भागामध्ये कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि आरोग्य जनजागृतीमध्ये घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे. नैसर्गिक आपत्ती प्रवण क्षेत्र असो किंवा कठीण भौगोलिक परिस्थिती, उच्च जोखीम असलेल्या गर्भवती मातांची आणि बालकांची काळजी घेण्यात त्यांनी नेहमीच तत्परता दाखवली आहे.

 

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाची संकल्पना "आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सक्षम परिचारिका जीव वाचवतात" अशी ठेवण्यात आली होती. या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन