24 मेपूर्वी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : शासनाच्या महत्वाकांक्षी
डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) अंतर्गत उन्हाळी हंगाम 2026 ई-पीक पाहणी मोहिमेला 8 एप्रिल
2026 पासून सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावर पीक पेरा स्वतः
अँड्रॉईड मोबाईलद्वारे 24 मे 2026 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार
देवरे यांनी केले आहे.
उन्हाळी
हंगाम 2026 ई-पीक पाहणी अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत 47 हजार 894.37 हेक्टर
क्षेत्रावर नोंदणी झाली आहे. तसेच एकूण 7 लाख 99 हजार 195 पीक पाहणी करावयाच्या मालक
प्लॉटपैकी 37 हजार 45 प्लॉटवर संबंधित शेतकऱ्यांनी DCS व्हर्जन 4.0.6 या मोबाईल अॅपच्या
माध्यमातून आपल्या पिकांची नोंदणी केली आहे. उर्वरित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लवकरात
लवकर ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीक नोंदणी करावी, असे प्रशासनाने कळविले आहे.
सदर
नोंदणीसाठी अँड्रॉईड मोबाईल आवश्यक असून गुगल क्रोम अपडेट करून ई-पीक पाहणी व्हर्जन
4.0.6 अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेत बांधावर जाऊन प्रत्यक्ष
पीकांची माहिती अॅपमध्ये भरून अपलोड करावी. मोबाईल उपलब्ध नसल्यास किंवा अॅप हाताळण्यात
अडचण असल्यास संबंधित गावचे तलाठी, कोतवाल, कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच गावात नियुक्त
करण्यात आलेल्या सहाय्यकांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटल
क्रॉप सर्वे अंतर्गत 100 टक्के ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक असून उन्हाळी हंगामातील
उभे पीक, कायम पड अथवा चालू पड जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे. शेतकरी स्तरावर नोंदणी
न झालेल्या जमिनींची ई-पीक पाहणी सहाय्यक स्तरावरून पूर्ण करण्यात येणार असल्याचेही
प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान,
ई-पीक पाहणी नोंदणी न केल्यास सातबारावर पीक पेरा कोरा राहणार असून त्यानंतर नोंद करता
येणार नाही. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान व इतर लाभ मिळविण्यात अडचणी निर्माण
होऊ शकतात. अवेळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई व पीक विम्यासाठी
7/12 वर अचूक पीक नोंद असणे आवश्यक असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी 24 मे 2026 पूर्वी
आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
0000

Comments
Post a Comment