जिल्ह्यात “शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्व्हेक्षण अभियान २०२६-२७”सुरू; ९ लाख १९ हजार नागरिकांची शारीरिक तपासणी केली जाणार

 


 

बुलढाणा, दि. २९ मे (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुलढाणा जिल्ह्यात शून्य कुष्ठरुग्ण गावांचे सर्व्हेक्षण अभियान २०२६-२७ हे अभियान दि. १८ मे ते १८ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शून्य कुष्ठरुग्ण असलेल्या ७३३ गावांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असून सुमारे ९ लाख १९ हजार ५०५ नागरिकांची शारीरिक तपासणी केली जाणार आहे.

 

या अभियानासाठी जिल्हाभर प्रशिक्षित तपासणी पथके तयार करण्यात आली असून आरोग्य केंद्र स्तरावर सर्वेक्षणाची पाहणी केली जाणार आहे. तसेच तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी मोहिमेचे पर्यवेक्षण व सनियंत्रण करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा सभा घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हरी पवार यांनी शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्व्हेक्षण अभियानाची माहिती तसेच कुष्ठरोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

यावेळी डॉ. के. व्ही. राठोड यांनी कुष्ठरोगाची संशयित लक्षणे, निदान, उपचार आणि तांत्रिक बाबींविषयी माहिती दिली. जिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

या मोहिमेत जास्तीत जास्त संशयित रुग्ण शोधून त्यांचे निदान करून उपचाराखाली आणण्यावर भर देण्यात येत आहे. कुष्ठरोग उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो व सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये त्यावर मोफत उपचार उपलब्ध आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आरोग्य सेविका व आरोग्य सेवक घरोघरी जाऊन नागरिकांची शारीरिक तपासणी करणार असल्याने नागरिकांनी आपल्या शरीरावरील कोणतेही चट्टे, गाठी किंवा संशयित लक्षणांची तपासणी करून घ्यावी व मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी