इस्रायलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

 


बुलढाणा दि.8 (जिमाका): राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून इस्रायलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या सहकार्याने Government-to-Government (G2G) पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र व प्रशिक्षित भारतीय उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक आहे. याशिवाय Care Giver किंवा Nursing संबंधित प्रशिक्षण जसे की GDA, ANM, GNM किंवा B.Sc Nursing झालेले असणे अनिवार्य आहे.

उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचा किंवा उमेदवाराच्या जोडीदार, पालक अथवा मुलांचे सध्या इस्रायलमध्ये वास्तव्य नसावे किंवा ते तेथे कार्यरत नसावेत. उमेदवाराकडे किमान तीन वर्षे वैध असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे.

सदर भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती https://maharashtrainternational.com  या संकेतस्थळावरील ‘Latest Jobs’ विभागात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.

जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन या रोजगार संधीची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बुलढाणा बसस्थानक समोर, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना