मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी नोंदवावी

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 21 : सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प जातीच्या अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा पावसाळी प्रजनन हंगाम जूलै 2026 पासून सुरु होत आहे.  मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर जि. बुलढाणा येथे 15 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मत्स्यकास्तकार, शेतकरी व सहकारी संस्थांनी मत्स्यबीजाची मागणी लेखीस्वरुपात नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.

जिल्ह्यातील भूजलाशयीन मच्छिमारी सहकारी संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक तसेच पाटबंधारे विभागाचे तलाव, जलाशय आणि जिल्हा परिषदेकडील सिंचन व पाझर तलाव मासेमारी ठेक्याने घेतलेल्या संस्थांनी शासनाच्या धोरणानुसार अपेक्षित प्रमाणात मत्स्यबोटूकली संचयन करणे बंधनकारक असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे. विभागामार्फत प्रमुख कार्प, रोहू, कटला, सायप्रिनस, पंगेशियस तसेच गिफ्ट तिलापिया या प्रजातींचे मत्स्यजिरे, मत्स्यबीज, बोटूकली आणि प्रगत बोटूकली विविध दराने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

सर्व मच्छिमारी सहकारी संस्था आणि मत्स्यकास्तकारांनी फक्त शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रातूनच बीज खरेदी करणे बंधनकारक आहे. बीज खरेदीची पावती जवळ ठेवणे आवश्यक असून, ती कोणत्याही शासकीय योजनेच्या लाभासाठी आवश्यक मानली जाणार आहे. बाहेरून, इतर जिल्हा किंवा राज्यातून, खाजगी मार्गाने बीज खरेदीसाठी जिल्हा कार्यालयाची पूर्व परवानगी अनिवार्य आहे. विनापरवानगी बीज खरेदी आढळून आल्यास शासन धोरणानुसार कारवाई केली जाईल. मत्स्यबीज संचयनाचे पंचनामे करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शासकीय योजनांचा लाभ घेणे कठीण होऊ शकते. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शेततळ्यातील किंवा तलावातील संचयनासाठी लागणाऱ्या मत्स्यजिरेची मागणी लेखी स्वरुपात सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलढाणा येथे त्वरीत नोंदवावी.

अधिक माहितीसाठी उत्कर्ष चाचरकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा (८६६८२६७०८८), नि. मा.साळुंके सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी मत्स्यबीज केंद्र कोराडी (८६६९०७२७६८) या मोबाईल क्रमांकावर किंवा कार्यालयाच्या दूरध्वनी ०७२६२-२४२२५४ क्रमांकावर संपर्क साधावा. मत्स्य उत्पादन वाढीसाठी हे बीज संचयन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सर्वांनी यामध्ये सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी