जागतिक मधमाशी दिनानिमित्त बुलढाण्याच्या राजेंद्रदास बैरागी यांना राज्यस्तरीय “मधुमीत्र” पुरस्कार

 


बुलढाणा, दि. 21 (जिमाका): जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2026 चा राज्यस्तरीय मधुमीत्र पुरस्कार धाड (ता. जि. बुलढाणा) येथील मध उत्पादक व मधुपालक राजेंद्रदास प्रकाश बैरागी यांना प्रदान करण्यात आला.

मध उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, दीर्घ अनुभव, मध उत्पादन, मधमाशांच्या वसाहतींचे संवर्धन, प्रशिक्षण तसेच संशोधनात्मक योगदान या निकषांच्या आधारे निवड समितीमार्फत त्यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार 20 मे 2026 रोजी संत एकनाथ रंगमंदिर, क्रांती चौक, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बैरागी यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य सभापती (राज्यमंत्री दर्जा) रविंद्रजी साठे, लक्ष्मण अधिकारी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) राजकुमार डांगर, उप मुख्य अधिकारी (उद्योग) नित्यानंद पाटील, मध संचालक महाबळेश्वरचे रघुनाथ नारायनकर तसेच जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बुलढाणा संजय इंगळे तसेच सर्व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, कर्मचारी, मधनिरीक्षक, मधुपालक व मध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेंद्रदास बैरागी यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून जिल्ह्यातील मध उद्योग क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित