जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव · मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
बुलढाणा, दि. 14 (जिमाका): बुलढाणा हा शैक्षणिकदृष्ट्या
मागे असला तरी, आता जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि
कृषी महाविद्यालयासारख्या संस्था उभ्या राहत आहेत. या शैक्षणिक व पायाभूत सुविधांमुळे
जिल्ह्याचा कायापालट होणार असून, सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध
आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री
प्रतापराव जाधव यांनी केले.
संत गाडगे
बाबा अमरावती विद्यापीठ संचालित बिरसिंगपूर येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे
भूमिपूजन ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी
आमदार संजय गायकवाड, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते,
प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए
पुष्कर देशपांडे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर नागरे, मॉडेल
डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. ए.आर. म्हळसने, कार्यकारी अभियंता जे.एन. काळे, पोलीस
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच बिरसिंगपूरच्या सरपंच वैशाली शिंदे आदी उपस्थित
होते.
केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव म्हणाले की, जिल्ह्यातील
लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आज महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाला
सुरुवात होत आहे. या महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी
उत्तम सोय उपलब्ध होणार आहे. सुसज्ज इमारतीसोबतच येथे स्विमिंग पूल, क्रीडांगण यांसारख्या
आधुनिक सुविधा निर्माण केल्या जातील. यातून गुणवंत विद्यार्थी घडतील आणि जिल्ह्याचा
नावलौकिक वाढेल. तसेच, सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे सर्वांनी पालन करावे, असेही त्यांनी
नमूद केले.
आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांना
शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. पंरतु आता मॉडेल डिग्री कॉलेजमुळे जिल्ह्यातच
गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम
उच्च दर्जाचे व्हावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
भुमीपूजन सोहळ्याचे अध्यक्षीय भाषण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश
असनारे यांनी, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले.
00000








Comments
Post a Comment