अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम निवासी शाळेत प्रवेशासाठी मुदतवाढ
बुलढाणा, दि. 15 (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत
येणाऱ्या अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील
नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये इयत्ता १ लीमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७
करिता प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ मे २०२६ पर्यंत
अर्ज सादर करावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी
केले आहे.
प्रवेश
अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालय तसेच नजीकच्या
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही भुलथापांना बळी न पडता अथवा
इतर माध्यमातून अर्ज न घेता संबंधित कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून अर्ज प्राप्त
करून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १०
मे २०२६ पर्यंत होती. मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ मे २०२६ पर्यंत राहणार आहे.
प्रवेशासाठी
विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीचा दाखला, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असल्याचा
तहसीलदारांचा दाखला, आधार कार्ड प्रत, संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडणे आवश्यक
आहे. इयत्ता १ लीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक
आहे. तसेच आदिम जमातीतील विद्यार्थी, विधवा,
घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अपूर्ण कागदपत्रे अथवा खोटी माहिती आढळल्यास
प्रवेश रद्द करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000
Comments
Post a Comment