मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण अभियान सुरू; ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार; राज्यातील ९.८६ कोटी मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी
बुलढाणा दि.25 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या
कलम ३२४ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल
पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा
समावेश करण्यात आला असून राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष
पडताळणी करण्यात येणार आहे.
राज्यात मागील
दोन दशकांपासून केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण होत होते. विशेष सखोल पुनरिक्षण मात्र
२००२-०४ नंतर झालेले नव्हते. दरम्यानच्या काळात शहरीकरण, स्थलांतर आणि नव्या नोंदणीमुळे
मतदार याद्यांमध्ये दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा त्रुटी निर्माण झाल्याची
शक्यता लक्षात घेऊन ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
संविधानाच्या
कलम ३२६ नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक
असणे आणि वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानुसार मतदारांच्या नागरिकत्वाची
खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगावर आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम २१
नुसार आयोगाला विशेष सखोल पुनरिक्षण करण्याचे अधिकार आहेत.
राज्यातील १
लाख २५३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) या मोहिमेत सहभागी होणार असून राजकीय पक्षांनी
नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत. राज्यात
सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेचा विचार करून महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित
करण्यात आले आहे.
मोहिमेचे वेळापत्रक
• २० ते २९ जून २०२६ : गणना अर्ज छपाई व
BLO प्रशिक्षण
• ३० जून ते २९ जुलै २०२६ : BLO मार्फत घरभेटी
देऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन
• ५ ऑगस्ट २०२६ : प्रारूप मतदार याद्यांचे
प्रकाशन
• ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती
स्वीकारणे
• ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत : दावे-हरकती निकाली
काढणे
• ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
करणे
या कालावधीत
BLO घरोघरी भेट देऊन पूर्वभरलेले गणना प्रपत्र (Pre-filled Enumeration Form) मतदारांना
वितरित करतील. या प्रपत्रात विद्यमान मतदार माहिती तसेच संबंधित मतदार किंवा त्यांच्या
आई-वडील अथवा आजी-आजोबांच्या २००२-०४ मधील मतदार यादीतील नोंदीचा तपशील उपलब्ध असेल.
मतदारांना नविन छायाचित्र सादर करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
गृहभेटीदरम्यान
घर बंद आढळल्यास BLO किमान तीन वेळा भेट देणार असून त्याची नोंद ठेवण्यात येणार आहे.
मतदारांना गणना प्रपत्र ऑनलाईन पद्धतीनेही भरता येणार आहे.
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर
ज्या मतदारांच्या नोंदींची जुळवणी होणार नाही किंवा त्रुटी आढळतील, त्यांना नोटिसा
देण्यात येतील. अशा मतदारांची यादी स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, तहसील कार्यालय
तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
केली जाणार आहे.
भारत निवडणूक
आयोगाने स्पष्ट केले आहे की, आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल;
मात्र आधार कायद्यानुसार ते नागरिकत्वाचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही.
या प्रक्रियेत
पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय
प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख
१३ हजार ५५८ BLA नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकाधिक प्रतिनिधी
नियुक्त करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच मान्यताप्राप्त राजकीय
पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
000000
Comments
Post a Comment