देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची केमिस्ट संघटनांसोबत बैठक संपन्न
बुलढाणा, दि. 15 (जिमाका): ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स
(AIOCD) यांच्या वतीने बुधवार दि. 20 मे 2026 रोजी देशव्यापी एक दिवसीय बंदची घोषणा
करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा
सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा कार्यालयाने आवश्यक उपाययोजना सुरू
केल्या आहेत.
देशातील
ठोक व किरकोळ औषध विक्रेत्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ व्यवहार
बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांना औषधांचा कोणताही तुटवडा जाणवू नये
यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. या अनुषंगाने दि. 13 मे 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन,
बुलढाणा कार्यालयात सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन प्र. धीरके यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्ह्यातील केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक समन्वय,
खबरदारी व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
फुड
अँड ड्रग्ज अॅडमिनीस्ट्रशन महाराष्ट्र (Food and Drug Administration Maharashtra)
यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने
तसेच 24 तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी संपर्क साधण्यात येत असून अत्यावश्यक औषधांचा
पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधितांना औषधांचा
पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय,
पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडीयन मेडीकल असोसिएशन
तसेच खाजगी व निमसरकारी रुग्णालयांशी समन्वय साधून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
प्रत्येक तालुका व गाव पातळीवर आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील
असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीस
केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना, बुलढाणा यांचे अध्यक्ष गजानन जी. शिंदे, उपाध्यक्ष राजू
पाटील तसेच निलेश गावंडे, गणेश बंगाळे, अभिजीत निंबाळकर, उमेश मुंदडा, चंद्रशेखर बारोटे
व सुभाष पाटील उपस्थित होते. प्रशासनास आवश्यक सहकार्य करण्याबाबत संघटनांनी सकारात्मक
भूमिका व्यक्त केली.
नागरिकांनी
अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाने
केले आहे. औषध पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन,
बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे. अधिक माहितीसाठी
ई-मेल : [acfdabuldhana@gmail.com](mailto:acfdabuldhana@gmail.com) संपक साधावा.
000000
Comments
Post a Comment