अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना; शाश्वत उत्पादनासाठी योग्य नियोजन, बीजप्रक्रिया व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 22 (जिमाका): यंदाच्या खरीप हंगामात अल निनो (El Nino) चा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. पिकांचे नुकसान टाळणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शाश्वत उत्पन्न सुनिश्चित करणे हा या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याचा सल्ला दिला असून पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी (Germination Test) करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जमिनीत किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पेरणीदरम्यान ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएसबी, अॅझोटोबॅक्टर किंवा लिक्विड कन्सॉर्शिया यांसारख्या जैविक घटकांद्वारे बीजप्रक्रिया करावी. यामुळे रासायनिक खतांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.  सोयाबीन क्षेत्र अधिक असल्याने बीबीएफ (Broad Bed Furrow) अर्थात रुंद वरंबा-सरी पद्धतीने किंवा बेडवर टोकन पद्धतीने पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पद्धतीमुळे कमी किंवा जास्त पावसातही पिकांचे नुकसान कमी होते.

रासायनिक खतांचा अतिरेक टाळून मृदा आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खत व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे २३ हजार हेक्टरवरील फळबागांचे संरक्षण करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन, जैविक आच्छादन (Mulching) आणि शेततळ्याद्वारे संरक्षित सिंचनाचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. या उपाययोजनांसाठी शासनाच्या विविध योजनाही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल शेतीला प्रोत्साहन देताना कृषी विभागाने ‘महाविस्तार ॲप’ डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी हे अॅप डाउनलोड केले असून याच्या माध्यमातून हवामान, पिक व्यवस्थापन आणि विविध योजनांची माहिती उपलब्ध होत आहे.

तसेच ‘ॲग्री स्टॅक’ अंतर्गत फार्मर आयडी काढणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८५ टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केला असून उर्वरित शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान व पीक सल्ल्याचा वापर करून पिकांचे वेळेत संरक्षण करावे, असेही विभागाने नमूद केले आहे.

दरम्यान, पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागामार्फत सुरू करण्यात येणाऱ्या ‘फार्मर कप’ स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, तसेच गावपातळीवरील विविध कृषी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योग्य नियोजन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हीच अल निनोवर मात करण्याची गुरुकिल्ली आहे, असे कृषी विभागाने म्हटले असून अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित