जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १४२ विंधण विहिरी व २७ कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी

 


 

बुलढाणा, दि. 18 (जिमाका): जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सन २०२५-२६ साठी ११७ गावांमध्ये १४२ विंधण विहिरी तसेच १९ गावांमध्ये २७ कुपनलिका मंजूर केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णय दि. ३ फेब्रुवारी १९९९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून या उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी सादर केलेल्या प्रस्तावांना संबंधित तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच सहाय्यक भूवैज्ञानिक आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन शिफारस केली होती. त्यानुसार चिखली, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा, बुलढाणा, जळगाव जामोद, मेहकर आणि नांदुरा तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.

 

संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक कुपनलिका मंजूर करण्यात आल्या असून दयालनगर, शिवनी, लोहगाव बु., करमोडा, मारोड यांसारख्या गावांमध्ये एकापेक्षा अधिक कुपनलिका मंजूर झाल्या आहेत. बुलढाणा तालुक्यात सागवण येथे ५ विंधण विहिरी, रायपूर व घाड येथे प्रत्येकी २ विंधण विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. मेहकर तालुक्यात गोमेघर येथे ४ तर वरवंड, पारखेड आणि अंजनी येथे प्रत्येकी २ विंधण विहिरी मंजूर झाल्या आहेत. लोणार तालुक्यातही अनेक गावांमध्ये विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे.

 

प्रशासनाने मंजूर कामांसाठी अटी व शर्ती लागू केल्या आहेत. कामे तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष टंचाई कालावधीत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर सोपविण्यात आली आहे. तसेच कामे सुरू करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर पंचनामा करणे, जिओ टॅगिंग फोटो सादर करणे, खाजगी जागेवरील कामांसाठी दानपत्र घेणे आणि कामांच्या गुणवत्तेची खात्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय, नव्या विंधण विहिरी सुरू करण्यापूर्वी नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. मंजूर कामे ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे आवश्यक असून मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास मंजुरी व्यपगत होणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

000000

Comments