चाइल्ड हेल्पलाईन बुलढाणाला मोठे यश : महिनाभरात 24 बालविवाह रोखले नागरिकांना 1098 वर माहिती देण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 20 (जिमाका): महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत चाइल्ड हेल्पलाईन 1098 व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलढाणा यांनी मागील एका महिन्यात जिल्ह्यातील तब्बल 24 बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे. बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासनाने ॲक्शन मोडमध्ये काम करत विविध यंत्रणांच्या समन्वयातून ही प्रभावी कारवाई केली.

चाइल्ड हेल्पलाईन 1098 बुलढाणा यांना प्राप्त झालेल्या 24 तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

चाइल्ड हेल्पलाईन बुलढाणा टीममधील प्रकल्प समन्वयक श्री. शेख, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, केस वर्कर प्रवीण गवई, मुकेश मोरे व राहुल सुरडकर यांनी गावपातळीवर ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांच्याशी समन्वय साधून संभाव्य बालविवाह थांबविण्यासाठी प्रभावी कार्यवाही केली.

तक्रार प्राप्त होताच चाइल्ड हेल्पलाईन टीमने घटनास्थळी भेट देऊन संबंधित पोलीस स्टेशन, पोलीस हेल्पलाईन 112, ग्रामीण व शहरी भागातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि अंगणवाडी यंत्रणेसोबत समन्वय साधत बालिकांचे विवाह थांबविले. त्यानंतर संबंधित बालिकांना पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समिती, बुलढाणा येथे हजर करण्यात आले.

बालकल्याण समितीने बालिकांची मुलाखत घेऊन प्रकरणांची चौकशी केली. काही गंभीर प्रकरणांमध्ये बालिकांची रवानगी शासकीय बालिका गृह, बुलढाणा येथे करण्यात आली. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील समुपदेशक शारदा पवार व चाइल्ड हेल्पलाईन समुपदेशक विद्या खरे यांनी बालिकांचे समुपदेशन करून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा व शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

तालुकानिहाय रोखण्यात आलेले बालविवाह : चिखली- 5, देऊळगाव राजा-4, सिंदखेड राजा-4, लोणार- 3, मेहकर- 2, मोताळा- 2, बुलढाणा- 2, मलकापूर-1, खामगाव- 1 असे जिल्ह्यातील तब्बल 24 बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या