मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रात द्वितीय, विदर्भात प्रथम क्रमांक

 


 

बुलढाणा, दि. 15 (जिमाका):  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, बुलढाणा जिल्हा कार्यालयाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात द्वितीय तर विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

 

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यास ३१२ भौतिक प्रस्तावांचा लक्षांक प्राप्त झाला होता. ग्रामीण भागात उद्योगांना चालना देऊन रोजगारनिर्मिती करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, बुलढाणा कार्यालयामार्फत तब्बल १ हजार ०५२ उद्योजकांचे प्रस्ताव टास्क फोर्स समितीची मान्यता घेऊन विविध बँकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.

 

मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच बँक अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे ३३८ प्रस्तावांना बँकांकडून मंजुरी मिळाली असून, यामध्ये एकूण ६८४.२३ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे योजनेच्या १०८ टक्के उद्दिष्टपूर्तीची नोंद झाली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ५५६ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. या यशामागे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय मोहनराव इंगळे यांचे योग्य नियोजन व प्रभावी मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सांगण्यात आले.

 

दरम्यान, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन युवकांनी उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या