कन्व्हेयन्स अभावी सोसायटी सदस्यांचे हक्क धोक्यात; डिम्ड कन्व्हेयन्ससाठी पुढे या -जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

 


 

बुलढाणा दि.19 (जिमाका): जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फ्लॅटधारकांनी अनेक वर्षांपूर्वी घरे खरेदी केली असली, तरी संबंधित जमिनीचा मालकी हक्क अद्यापही बिल्डर किंवा विकासकाच्या नावावर असल्याची गंभीर बाब अनेक ठिकाणी समोर येत आहे. विशेषतः पुनर्विकासाच्या प्रक्रियेदरम्यान ही समस्या प्रकर्षाने उघड होत असून, त्यामुळे सोसायटी सदस्यांचे कायदेशीर हक्क धोक्यात येत आहेत.

अशाच एका उदाहरणात, जुन्या सोसायटीत राहणारे जोशी काका आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत होते. त्यांनी तीस वर्षांपूर्वी फ्लॅट विकत घेतला होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना सोसायटीमध्ये पुनर्विकासाचा प्रस्ताव आला. मात्र, तपासणीदरम्यान जमिनीचा मालकी हक्क अजूनही विकासकाच्या नावावर असल्याचे समोर आले. परिणामी पुनर्विकासाची प्रक्रिया थांबली, वाद निर्माण झाले आणि सदस्यांना आपल्या घराच्या जमिनीवर कायदेशीर हक्क नसल्याचे वास्तव समोर आले.

 

ही समस्या केवळ एका सोसायटीपुरती मर्यादित नसून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आढळून येत आहे. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे कन्व्हेयन्सप्रक्रिया पूर्ण न होणे होय. गृहनिर्माण सोसायटीच्या संदर्भात कन्व्हेयन्स म्हणजे विकासक किंवा बिल्डरकडून जमीन व इमारतीचा मालकी हक्क अधिकृतपणे सोसायटीच्या नावावर हस्तांतरित करणे. फ्लॅटधारकांना त्यांच्या सदनिकेचा ताबा मिळत असला तरी संपूर्ण जमीन व इमारतीचा हक्क सोसायटीकडे येण्यासाठी कन्व्हेयन्स करणे अत्यावश्यक असते.

विकासकाने हा हक्क देण्यास टाळाटाळ केल्यास डिम्ड कन्व्हेयन्स या कायदेशीर प्रक्रियेद्वारे सोसायटीला मालकी हक्क मिळवता येतो. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963 मधील कलम 11 नुसार, सोसायटी स्थापन झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत विकासकाने जमीन व इमारतीचा हक्क सोसायटीकडे हस्तांतरित करणे बंधनकारक आहे.

 

बिल्डरने कन्व्हेयन्स न केल्यास होणारे संभाव्य नुकसान : फ्लॅट स्वतःच्या मालकीचा असला तरी सोसायटीच्या जमीन व इमारतीवर कायदेशीर अधिकार राहत नाही, इमारतीला नुकसान झाल्यास किंवा इमारत कोसळल्यास पुनर्बांधणीसाठी बिल्डर अथवा जमीन मालकाची परवानगी आवश्यक ठरू शकते. विकासकाकडे मालकी हक्क असल्याने तो संबंधित मालमत्ता तारण ठेवू शकतो. पुनर्विकासावेळी अतिरिक्त एफएसआय किंवा रिकामी जागेचा फायदा बिल्डर घेऊ शकतो. सोसायटीची मोकळी जागा, बाग, गच्ची किंवा पार्किंग जागा विकून नफा मिळवण्याची शक्यता राहते. अनेक वर्षांनी कन्व्हेयन्स मागितल्यास बिल्डरकडून मोठ्या रकमेची मागणी केली जाऊ शकते. विकासक किंवा बिल्डरने त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही, तर संबंधित गृहनिर्माण संस्थांनी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करून डिम्ड कन्व्हेयन्स प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, असे आवाहन जी. पी. साबळे यांनी केले आहे. डिम्ड कन्व्हेयन्ससाठी प्रस्ताव सहकारी संस्था कार्यालय येथे सादर करता येणार आहेत.

000000

Comments