बुलढाण्यात राज्यस्तरीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
बुलढाणा:
दि, ०४ (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे
१७ वर्षांखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात
आले होते. २ आणि ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध
विभागांतून खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच अशा एकूण २११ जणांचा सहभाग होता.
स्पर्धेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या
हस्ते झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारार्थी टी.एस. सोर, उपविभागीय पोलीस अधिकारी
सुधीर पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री अजित पवार
यांना श्रद्धांजली अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करण्यात
आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सदाशिव शेलार यांनी खेळाडूंना
क्रीडा क्षेत्रातील ५ टक्के आरक्षणाच्या संधीचा लाभ घेऊन करिअर घडविण्याचे आवाहन केले.
टी.एस. सोर यांनी खेळाडूंचे मैदानाशी असलेले नाते अधोरेखित करत शूटिंगबॉल खेळाच्या
विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू
गौरी म्हस्के हिने खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. तसेच गौरी म्हस्के, कार्तिकी गरगडे आणि
डॉ. निकीता वाकोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
रात्रीच्या वेळी प्रकाशझोतात झालेले सामने या स्पर्धेचे
मुख्य आकर्षण ठरले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि
विविध तालुक्यांच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
0000
Comments
Post a Comment