जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धांचा बुलढाण्यात शुभारंभ

 






बुलढाणा, दि. 12 फेब्रुवारी: बुलढाणा जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आयोजित तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा आज स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहात शुभारंभ झाला. अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्हा परिषदांचे अधिकारी व कर्मचारी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पर्धकांना संबोधित करताना सांगितले की, हा उपक्रम वैयक्तिक क्रीडा कौशल्य विकासाबरोबरच परस्पर समन्वय, सांघिक वृत्ती आणि सहकार्य भावना दृढ करणारा आहे. या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकसेवा अधिक सक्षम करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. बुलढाण्याला मिळालेली ही आयोजनाची संधी अमरावती विभागासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी भूषविले. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिस्त व सभ्यता या मूल्यांच्या आधारे अमरावती विभाग राज्यात नावलौकिक मिळवेल, असा आशावाद व्यक्त केला. विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेचे अपर आयुक्त राजीव फडके यांनी विभागीय आयुक्तांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.

दीपप्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण आणि क्रीडा ज्योत प्रज्वलन करून स्पर्धांचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. खेळाडूंना शपथ देण्यात आली. केम्ब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने सादर केलेल्या संगीतमय वातावरणात आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले.

कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बोराखेडी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांची दाद मिळविली. विविध विभागांचे अधिकारी, खातेप्रमुख तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे व किरण वाघमारे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या