शासकीय कार्यालयांनी कापड साहित्य खरेदीसाठी हातमाग महामंडळाला प्राधान्य द्यावे

 


बुलढाणा: दि, 05 (जिमाका): हातमाग विणकरांना नियमित रोजगार उपलब्ध करून देणे तसेच पारंपरिक हातमाग व्यवसायाला चालना देण्याच्या सामाजिक उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या., नागपूर यांच्याकडून शासकीय व निमशासकीय कार्यालये, दवाखाने व वसतिगृहांनी आवश्यक कापड साहित्याची खरेदी करावी, असे आवाहन महामंडळ व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

सन १९७१ मध्ये कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या या महामंडळामार्फत बेडशिट, चादर, दरी, टॉवेल, कम्बल, ड्रेस मटेरियल यासह विविध हातमाग उत्पादने तयार करण्यात येतात. केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालयाच्या दिनांक ०३ सप्टेंबर २००८ च्या आदेशानुसार हातमाग उद्योग टिकवून ठेवण्यासाठी ११ वस्तू आरक्षित ठेवण्यात आल्या असून, त्यामध्ये वरील उत्पादनांचा समावेश आहे.

शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांसाठी सत्कारमूर्ती व मान्यवर पाहुण्यांना देण्यासाठी कापडी गुलदस्ते, पैठणी व करवती स्टोल, दुपट्टे, हिमरु शॉल, पैठणी साड्या व पर्स उपलब्ध आहेत. कापडी गुलदस्त्यांमधील साहित्य दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असल्याने पर्यावरणपूरक व सामाजिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे.

राज्य शासनाच्या परिपत्रक क्र. कापड २०१८/प्र.क्र.४२/टेक्स-३ दिनांक १८ एप्रिल २०१८ नुसार, विदर्भ व मराठवाडा विभाग तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यांसाठी शासकीय पुरवठ्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर यांना निश्चित करण्यात आले आहे. तसेच उद्योग संचालनालय व मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार दरनिश्चितीची मान्यता देण्यात आलेली आहे.

तरी शासकीय व निमशासकीय कार्यालये, दवाखाने व वसतिगृहांनी आवश्यक कापड साहित्याची खरेदी करण्यासाठी मुख्य भांडार विक्री केंद्र, उमरेड रोड, नागपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ www.mahahandloom.com, ई-मेल mshcngp@yahoo.com किंवा मोबाईल क्रमांक ९५७९८३७७४० वर संपर्क साधता येईल.

0000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना