शासकीय वसतिगृह, आधार आणि स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

 

 

बुलढाणा: दि, 05 (जिमाका): शासकीय वसतिगृहापासून वंचित राहिलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक किंवा अव्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे, मात्र शासकीय वसतिगृहात क्षमतेअभावी प्रवेश मिळालेला नाही, असे विद्यार्थी या योजनांसाठी पात्र ठरतील. पात्रतेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि विद्यार्थ्याला किमान ६० टक्के गुण (दिव्यांगांसाठी ५० टक्के) असणे अनिवार्य आहे. तसेच अर्जदाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि तो कोणत्याही नोकरी किंवा व्यवसायात नसावा. विद्यार्थ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे आणि संबंधित शैक्षणिक संस्थेच्या शहरात तो स्थानिक रहिवासी नसावा.

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याचे प्रमाणपत्र, अनाथ किंवा दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतचे नोटरी प्रतिज्ञापत्र आणि स्वयंघोषणा पत्र ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी ६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ असा असून, १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान अर्जांची छाननी केली जाईल. पहिली निवड यादी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. गुणवत्ता आणि पात्रतेनुसार या अर्जांचा विचार 'स्वयंम' आणि 'आधार' योजनेसाठी केला जाईल, असे प्रशासनाने कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या