कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीमेत २४६ संशयित कुष्ठरुग्णांची नोंद

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 17 :   स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीम ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून एकूण १८ हजार ७६५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २४६ संशयित कुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी नव्याने ८ रुग्णांचे निदान झाले आहे. संबंधित रुग्णांवर तत्काळ बहुविध औषधोपचार (MDT) सुरू करण्यात आले आहेत.

मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये व नगरपालिका दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील वीटभट्ट्या, चुना भट्ट्या, गिट्टी खदानी, आश्रमशाळा, वसतिगृहे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, कारागृह, बालसुधारगृह, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती तसेच भटके व स्थलांतरित नागरिकांची विशेष तपासणी करण्यात आली.

कुष्ठरोगाची लक्षणे म्हणून त्वचेवर फिकट पांढरे किंवा लालसर तांबूस रंगाचे बधिर चट्टे, त्वचा तेलकट व गुळगुळीत दिसणे, भुवयांचे केस विरळ होणे, हात-पायांना मुंग्या येणे व बधिरता, बोटे वाकडी होणे, अंगावर गाठी येणे, मज्जातंतू बाधित होणे व कानाच्या पाळ्या जाड होणे अशी चिन्हे आढळू शकतात. रोगाचे निदान झाल्यानंतर सहा महिने ते एक वर्ष कालावधीत बहुविध औषधोपचार दिला जातो. या उपचारपद्धतीमुळे कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

उपचार न घेतल्यास हात-पायांना जखमा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. हरी पवार, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठ), यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या