जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महाकुंभाचे उद्घाटन खेळाडूंच्या पथसंचलनातून सामाजिक संदेशांचा प्रभावी आविष्कार
बुलढाणा, दि. 12 (जिमाका): स्थानीय जिल्हा क्रीडा संकुल
येथे आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व
सांस्कृतिक महाकुंभाचा प्रारंभ उत्साहात झाला. पहिल्या दिवशी उद्घाटन
समारंभात सहभागी खेळाडूंच्या पथकांनी मान्यवरांना मानवंदना देताना आकर्षक देखावे
सादर केले. सामाजिक आशय, लोकसंस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम असलेल्या या
पथसंचलनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्हा
परिषदांमधील सुमारे १,१५० खेळाडूंनी पथसंचलनात
सहभाग नोंदविला. अनुरूप वेशभूषा, रंगभूषा, संगीत आणि संवाद यांच्या माध्यमातून
विविध सामाजिक विषयांवर सादरीकरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब
खरात यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ.
किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.
लोककलांचा जागर : अकोला जिल्हा
परिषदेच्या चमूने कीर्तन, पोवाडा, भारुड, लावणी, कोळी नृत्य, वारली नृत्य,
वाघ्या-मुरळी आदी महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण लोककलांचे सादरीकरण करत
लोकसंस्कृतीशी असलेली नाळ अधोरेखित केली.
मराठी भाषेचे संवर्धन : बुलढाणा
जिल्हा परिषदेच्या पथकाने मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबद्दल शासनाचे आभार
मानत मराठी साहित्य-संस्कृतीचे जतन आणि मराठी शाळांची आवश्यकता यावर प्रभावी
देखावा सादर केला.
वारकरी परंपरेचा गौरव : अमरावती
जिल्हा परिषदेने संत गजानन महाराजांच्या शेगावीची वारी या संकल्पनेवर आधारित
देखावा सादर केला. अन्नछत्र, यात्रेकरू निवास, सेवाधारी वृत्ती, स्वच्छता आणि
स्वयंशिस्त यांसारख्या मूल्यांचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणाने मंचावरील
मान्यवरांसह उपस्थितांना भावूक केले.
ऐतिहासिक अभिमान : वाशिम जिल्हा
परिषदेच्या चमूने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्यातील संवाद, त्याग आणि
बलिदान यांवर आधारित ज्वलंत ऐतिहासिक देखावा सादर करत मराठी स्वाभिमानाची आठवण
करून दिली.
मानवतेचा संदेश :
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पथकाने
सामाजिक विषमतेचे विदारक वास्तव मांडत संत गाडगेबाबांच्या “भुकेल्याला अन्न द्या” या संदेशाचा हृदयस्पर्शी
आविष्कार केला. या सादरीकरणाने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
पाचही जिल्ह्यांच्या संघांनी सादर केलेल्या सामाजिक
संदेशप्रधान देखाव्यांमुळे उद्घाटन समारंभातील पथसंचलन आकर्षक, आशयघन आणि
संस्मरणीय ठरले. महाकुंभाच्या पुढील दोन दिवसांत विविध क्रीडा व सांस्कृतिक
स्पर्धा रंगणार आहेत.
0000






Comments
Post a Comment