ग्रामीण पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जल अर्पण दिवस साजरा करण्यात येणार - मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

 


Ø  8 ते 22 मार्च दरम्यान जल अर्पण दिवस होणार साजरा

 बुलढाणा दि 26(जिमाका):  ग्रामीण भारतात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा पायाभूत सुविधा आता उभारल्या गेल्यामुळे गावे पाणीपुरवठा प्रणालीच्या संचालन आणि देखभाल दुरुस्ती च्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. या केवळ पायाभूत सुविधा नसून समुदाय आणि सरकार यांच्यातील अनेक वर्षाचा आशावाद, प्रयत्न आणि भागीदारीचे प्रतीक आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर त्यांचे हस्तांतरण काळजीपूर्वक, स्पष्टतेने आणि सामायिक अभिमानाने केले पाहिजे. ज्यामुळे पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती आणि समुदायाच्या हाती येईल .जे आता त्यांच्या गावाच्या पाणीपुरवठा प्रणालीचे संरक्षक म्हणून नेतृत्व करतील. यासाठी दिनांक 8 मार्च ते 22 मार्च दरम्यान देशभर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जल उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातही या उपक्रमाचे प्रभावी आयोजन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी यंत्रणेला दिले आहेत.

     देशभर राबविण्यात येत असलेल्या जल उत्सवा मध्ये दिनांक 8 ते 22 मार्च दरम्यान जी गावे  हर घर जल घोषित झालेली आहेत, आणि योजना हस्तांतरित झालेल्या आहेत अशा गावांमध्ये जल अर्पण दिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक पूर्वतयारी करायची आहे त्यामध्ये 15 ते 30 दिवसाचे नळ पाणी पुरवठा योजनेची चाचणी घ्यायची आहे. योजनेचे अपंगाची पाहणी व पडताळणी करायची आहे. दस्तऐवजाची उपलब्धता असणे गरजेचे आहे. पाणी गुणवत्तेचे फिल्ड टेस्ट किटद्वारे तपासणी करायची आहे. तसेच संस्थात्मक पूर्वतयारी यामध्ये महत्त्वाची आहे. बँक खात्यासह कार्यान्वित पाणीपुरवठा स्वच्छता समिती असणे गरजेचे आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ जसे ऑपरेटर, नल जल मित्र यांची आवश्यकता आहे. स्त्रोत शाश्वतता आणि सुरक्षितता आराखडा यामध्ये गरजेचा आहे. ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती ऑपरेटर यांचे प्रशिक्षण तत्पूर्वी होणे अनिवार्य आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे हस्तांतरण चे दस्तऐवजीकरण अनिवार्य आहे. तसेच लोकसभागीय जाणीव जागृती ही यासाठी गरजेची आहे. ग्रामसभा घेणे पीआरएचे आयोजन करणे फिल्ड टेस्ट किटचे प्रात्यक्षिक करणे, बचत गट सदस्य, अशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, युवक इत्यादींचा सुरक्षित पाणी व्यवस्थापनामध्ये सहभाग घेणे, विविध स्पर्धाचे आयोजन करणे, Meri Panchayat App & Panchayat Dashboard चे प्रदर्शन करणे आणि सदर उपक्रमाला खासदार, आमदार, स्थानिक पदाधिकारी यांना निमंत्रित करणे अशा प्रकारे जल अर्पण दिवस साजरा केला जाणार आहे.

जल अर्पण दिवसाचा मुख्य उद्देश पाण्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. त्या दिवशी त्या गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे, महिला सहभाग घेणे, जल प्रतिज्ञा घेणे, जल पूजन करणे, व पाण्याबाबत उपस्थितीना मार्गदर्शन करणे असे विविध उपक्रम त्यादिवशी आयोजन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा गुलाब खरात यांनी दिले आहे. या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन प्रकल्प संचालक जल जीवन मिशन सतीश देशमुख आणि कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अनिल चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा योजना हस्तांतरित करून घेणे अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची बाब असून यामुळे योजनेची मालकी ग्रामपंचायतला मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत आवश्यक ती सर्व माहिती व अभिलेखे पाणी पुरवठा विभागाकडून प्राप्त करून योजनेची इत्यंभूत माहिती मिळाली याची खात्री करून व नागरिकांना याबाबत जनजागृती करून पाणी कराची आकारणी सुधारित करून ती वसूल करावी. पाणी पुरवठा योजनेची वीज देयके, आवश्यक देखभाल करावी, असे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक यांनी सांगितले.

00000000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या