कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीमेत १६१ संशयित कुष्ठरुग्ण आढळले

 


बुलढाणा, दि. ५ (जिमाका): राज्यात कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने प्रभावी पावले उचलत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीम ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन साजरा करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

या मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, नगरपालिका दवाखाने यांच्या कार्यक्षेत्रात विशेष सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये वीटभट्ट्या, चुना भट्ट्या, गिट्टी खदानी, आश्रमशाळा, वसतिगृहे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, कारागृहे, बालसुधारगृहे, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती तसेच भटके व स्थलांतरित लोकसंख्या असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे.

दि. ३० जानेवारी २०२६ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ७६८ ठिकाणी ८,९०८ नागरिकांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली. या तपासणीत १६१ संशयित कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी नवीन ३ रुग्णांचे निदान निश्चित करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ही विशेष सर्व्हेक्षण मोहीम दि. १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी तसेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. हरी पवार, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठ), बुलढाणा यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या