पोषणमूल्यांनी समृद्ध राळा पिकास राज्यात चालना Ø शाश्वत शेती, आरोग्य सुरक्षा व शेतकरी उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त पीक

 


बुलढाणा: दि, 09 (जिमाका): राज्यातील बदलत्या हवामान परिस्थितीमुळे पारंपरिक पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असताना, राळा (नाचणी) हे पोषक तृणधान्य शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक ठरत आहे. कमी पावसात, हलक्या जमिनीत तसेच डोंगराळ भागातही तग धरू शकणारे राळा पीक शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२३ पासून पोषक तृणधान्यांच्या उत्पादन व वापरास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण आखले आहे. त्याअंतर्गत राळा, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांच्या लागवडीवर भर देण्यात येत असून, रागीला ‘सुपर फूड’ म्हणून मान्यता मिळत आहे. राळ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अत्यंत जास्त असल्याने लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध तसेच रक्तक्षय व मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हा आहार उपयुक्त ठरत आहे.

पोषणमूल्ये व आरोग्य लाभ

तज्ज्ञांच्या माहितीनुसार राळाच्या दाण्यांमध्ये सुमारे ६.६ टक्के प्रथिने, १.३ टक्के स्निग्ध पदार्थ, ७.५ टक्के फायबर, ३.६ टक्के खनिजे तसेच लोह व कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतात. राळाच्या नियमित सेवनामुळे पचनशक्ती सुधारते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते.

शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

राळा पिकाचा उत्पादन खर्च तुलनेने कमी असून कीड-रोगांचा प्रादुर्भावही कमी आढळतो. कोरडवाहू व आदिवासी भागात हे पीक उत्पन्नाचे स्थिर साधन ठरू शकते. राळापासून भाकरी, सत्त्व, डोसा, लाडू, पापड, बिस्किटे अशा विविध प्रक्रिया पदार्थांची मागणी वाढत असल्याने मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.

शासनाच्या योजना व उपक्रम

राळा पिकाच्या लागवडीसाठी शासनामार्फत सुधारित बियाणे, कृषी मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिरे तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोषण आहार योजना, अंगणवाडी, शालेय आहार व सार्वजनिक वितरण प्रणालीत राळाचा समावेश करण्याबाबतही सकारात्मक पावले उचलली जात आहेत.

शाश्वत विकासासाठी रागी महत्त्वाचा

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी पाणी लागणारी व पोषणमूल्यांनी समृद्ध अशी पिके भविष्यात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. राळा पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, जनतेचे आरोग्य सुधारणे आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देणे शक्य असल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या