संस्थाबाह्य संगोपनासाठी इच्छुक पालकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


बुलडाणा, (जिमाका) दि. 26 :  प्रत्येक बालकाला प्रेमळ व सुरक्षित कुटुंबीय वातावरण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित करत महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा प्रशासनाने संस्थाबाह्य संगोपन (प्रायोजकत्व/प्रतिपालकत्व) योजनेसाठी इच्छुक पालकांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 तसेच सुधारित 2021 मधील तरतुदींनुसार अनाथालय, बालाश्रम, बालगृह किंवा निरीक्षणगृह हे शेवटचा पर्याय मानले जातात. शक्य तितक्या बालकांचे पुनर्वसन कुटुंबीय वातावरणात व्हावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि सर्वांगीण विकास साधावा, हा कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

जिल्ह्यातील बाल संगोपन संस्थांमध्ये दाखल असलेली अनाथ, निराधार, परित्यागीत, असक्षम पालकांची किंवा दीर्घकाळ भेट नसलेली बालके यांना कुटुंबीय आधार मिळावा, यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

अर्जदारांचे पात्रता निकष : अर्जदार शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावेत, कोणतीही जीवघेणी वैद्यकीय स्थिती नसावी, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही जोडीदारांची संमती आवश्यक, एकल महिला : मुलगा/मुलगी दोन्ही स्वीकारू शकते, एकल पुरुष : फक्त मुलगा स्वीकारू शकतो, प्रेमळ व सुरक्षित कौटुंबिक वातावरण देण्याची बांधिलकी आवश्यक राहिल.

वयोमर्यादा : 6 ते 12 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्जदारांचे किमान वय 35 वर्षे, कमाल 70 वर्षे, तसेच 12 ते 18 वर्षे वयोगटासाठीही समान निकष लागू (संमिश्र व एकल वय निकष नियमांनुसार)

अर्ज प्रक्रिया : इच्छुक पालकांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्जानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलढाणा मार्फत पडताळणी व नमुना 30 नुसार गृहभेट अभ्यास अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर प्रकरणाची शिफारस बाल कल्याण समिती, बुलढाणा कडे केली जाईल.

पालनपोषणाचा कालावधी :  अल्पकालीन  कालावधी 1 वर्ष तर दीर्घकालीन 1 वर्षापेक्षा जास्त, बालकाच्या 18 वर्षांपर्यंत (मूल्यांकनाधारे). कायमस्वरूपी दत्तक प्रतिपालकत्वाखालील बालक व पालक कुटुंब यांची सुसंगती समाधानकारक असल्यास, दोन वर्षांनंतर दत्तक प्रक्रियेस पात्रता मिळू शकते.

अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बस स्टँड मागे, मुठ्ठे लेआऊट, डॉ. जोशी नेत्रालय जवळ, बुलढाणा येथे किंवा दूरध्वनी : 02762-299366, ई-मेल : dcpubuldana@gmail.com वर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या