विदर्भात उभे राहणार 'वनौषधी हब'; शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळण्याचे आवाहन
विदर्भात उभे राहणार 'वनौषधी हब'; शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळण्याचे आवाहन
बुलढाणा, (जिमाका)दि. २६ : विदर्भामध्ये वनौषधींची मोठी संपत्ती असून, या क्षेत्राचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला औषधी वनस्पतींच्या लागवडीची जोड द्यावी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित 'आयुर्वेदिक शेती उत्पादन आणि विक्री मार्गदर्शन' कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आयुष मंत्रालय कटिबद्ध असल्याचे सांगताना मंत्री जाधव म्हणाले की, आगामी काळात या भागात 'वनौषधी हब' विकसित करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पादनावरच नव्हे, तर प्रक्रियेवरही भर देता येईल. उत्पादित मालाच्या विक्रीसाठी मंत्रालयामार्फत हक्काचे व्यासपीठ (मार्केटिंग प्लॅटफॉर्म) उपलब्ध करून दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांची मध्यस्थांकडून होणारी पिळवणूक थांबण्यास मदत होईल.
या कार्यक्रमात तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर (डॉ.) महेश कुमार दाधीच आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या नागार्जुन वन औषधी प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. नितीन पतके उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना वनौषधींची निवड, लागवड तंत्रज्ञान, काढणीपश्चात प्रक्रिया आणि विपणन (Marketing) यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या मेळाव्याचे विशेष यश म्हणजे, अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीच नामांकित औषधी कंपन्यांसोबत खरेदी-विक्रीचे करार केले. या करारामुळे शेतकऱ्यांच्या मालाला निश्चित बाजारभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवून वनौषधी शेतीबाबत उत्साह दाखवला.
000000000000000
Comments
Post a Comment