“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानास मंत्रिमंडळाची मान्यता लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा निर्धार

 

 

बुलढाणा, दि. 27 (जिमाका): राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव या महत्त्वाकांक्षी अभियानास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. लोकसहभागावर आधारित ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार आहे.

 

गावपातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देणे, आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सामाजिक प्रबोधन तसेच विविध विभागांच्या समन्वयातून आरोग्यदायी गाव घडविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

 

या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणा, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, जीवनशैलीजन्य आजारांचे नियंत्रण तसेच मानसिक आरोग्य संवर्धन या बाबी मोहिमेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.

 

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती कार्यरत राहील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार गावांचे मूल्यमापन करण्यात येईल. एकूण गुणांपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना आरोग्यसंपन्न गाव म्हणून घोषित करण्यात येईल. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

या अभियानासाठी सुमारे ८०.७५ कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा निर्धार या माध्यमातून अधिक बळकट होणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना