अमृत संस्थेच्या ड्रोन प्रशिक्षणाची कीर्ती गोव्यापर्यंत गोवा सरकारच्या ३० अधिकाऱ्यांना ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत प्रशिक्षण

 


बुलढाणा: दि, 05 (जिमाका): महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या दर्जेदार ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाची कीर्ती आता महाराष्ट्राच्या सीमाही ओलांडून थेट गोव्यापर्यंत पोहोचली आहे. गोवा सरकारने आपल्या ३० अधिकाऱ्यांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यासाठी अमृत संस्थेची निवड केली असून, यासंदर्भातील प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी विविध कौशल्यविकास व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. त्याचाच एक भाग म्हणून ‘अमृत ड्रोन मिशन’ ही मोहीम सुरू करण्यात आली असून, ड्रोन पायलट बनण्यासाठीचे हे प्रशिक्षण लक्ष्यित घटकांसाठी पूर्णतः मोफत आहे.

आतापर्यंत या प्रशिक्षणाचा लाभ १०० हून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून, अनेकांनी या कौशल्याच्या आधारे शेती फवारणी, सर्व्हे, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी तसेच विविध सरकारी प्रकल्पांच्या निरीक्षणाच्या कामातून चांगली कमाई सुरू केली आहे. सध्या राज्यातील आठ ठिकाणी अमृत संस्थेमार्फत ड्रोन प्रशिक्षण दिले जाते.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज ओळखून अमृत संस्थेने हे मिशन सुरू केले. याच प्रशिक्षणाच्या गुणवत्तेने प्रभावित होऊन गोवा सरकारच्या नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालयाचे संचालक विजय सक्सेना यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना पत्र पाठवून प्रशिक्षणाबाबतची मंजुरी कळवली आहे.

पत्रात सक्सेना यांनी नमूद केले आहे की, अमृत ड्रोन मिशनअंतर्गत तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम अत्यंत उच्च दर्जाचा असून, प्रशिक्षक अनुभवी व सक्षम आहेत. गोवा सरकारच्या ३० अधिकाऱ्यांना ‘स्मॉल रिमोट पायलट सर्टिफिकेट (RPC)’ प्रशिक्षण देण्यासाठी अमृत संस्थेला मंजुरी देण्यात येत आहे.

दरम्यान, या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या