डीएचओ मानांकनात बुलढाणा राज्यात तृतीय; अमरावती परिमंडळात द्वितीय

 


बुलढाणा, दि. 16 (जिमाका): राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांकांवर आधारित माहे डिसेंबर 2025 च्या आरोग्य निर्देशांक मानांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच अमरावती परिमंडळात जिल्ह्याला द्वितीय स्थान मिळाले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2025 अखेर सलग सहा महिने बुलढाणा जिल्हा राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये राहिला. माता व बालक आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, विविध लसीकरण मोहिमा, आरसीएच ऑनलाईन पोर्टलवरील नोंदणी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम तसेच आयुष्मान भारत अंतर्गत मोफत तपासण्या यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी हे यशाचे प्रमुख घटक ठरले.

जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 280 आरोग्य उपकेंद्रे, 10 आपला दवाखाना केंद्रे आणि 40 नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमार्फत आरोग्य सेवा पुरविली जात आहे. सुरक्षित प्रसुती, प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर तपासणी, राष्ट्रीय कुटुंब नियोजन अभियान, तसेच आपत्कालीन परिस्थितीत 108  रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृवंदन अभियानाचीही प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

राज्याच्या यादीत 60.92 गुणांसह नागपूर प्रथम, 59.89 गुणांसह अकोला द्वितीय, 59.58 गुणांसह बुलढाणा तृतीय, 59.38 गुणांसह धाराशिव चतुर्थ आणि 58.61 गुणांसह सांगली पाचव्या क्रमांकावर आहेत. अमरावती परिमंडळात अकोला प्रथम तर बुलढाणा द्वितीय क्रमांकावर आहे.

केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत जिल्ह्याचा राष्ट्रीय मानांकनात समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या नियमित बैठका घेऊन नियोजनबद्ध कामकाज राबविण्यात आले.

हे मानांकन सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे, असे डॉ. अमोल गिते यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, सामुदायिक आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा अधिकारी, फार्मासिस्ट तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत समन्वयक यांच्या योगदानामुळे जिल्ह्याला हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

रिक्त पदांची संख्या अधिक असूनही नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण कामामुळे यश साध्य झाल्याचे गुलाब खरात यांनी स्पष्ट केले. मानांकन प्रक्रियेत डॉ. मिलिंद जाधव, डॉ. रणजीत मंडाले, डॉ. हरी पवार, डॉ. वर्षा गुट्टे, श्रीमती शीतल साखळीकर, श्री. अमर राठोड आदींनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य संस्थांचे अभिनंदन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना