अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

 


 

बुलढाणा,दि.27 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम एक महिना व दोन महिने अशा कालावधीत राबविण्यात येणार आहे.

 

सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करावा किंवा तांत्रिक कौशल्याच्या आधारे रोजगाराच्या संधी प्राप्त कराव्यात हा आहे. प्रशिक्षणादरम्यान संबंधित विषयांचे प्रॅक्टिकलसह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय मार्गदर्शन दिले जाणार आहे.

 

प्रशिक्षणात उद्योग उभारणी प्रक्रिया, शासकीय कर्ज व अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, तसेच कर कायदा व परवाने (लायसन्स) याविषयी तज्ञ मार्गदर्शकांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. लाभार्थींची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी अर्जदार हा 18 ते 45 वयोगटातील, अनुसूचित जाती प्रवर्गातील, किमान पदवीधर, तसेच गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. स्वयंरोजगार/रोजगार करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.

 

प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. इच्छुकांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, बुलढाणा येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी गणेश गुप्ता (मो. 8275093201) यांच्याशी संपर्क करावा किंवा www.mced.co.in/Barti या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना