'हिंद दी चादर’ शहीदी समागम सोहळा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

 










 

बुलढाणा/सिंधुदुर्गनगरी दि. 20 (जिमाका):-  शीख धर्माचे नववे गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त हिंद दी चादर अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजागृती अभियानास उत्साहात प्रारंभ झाला आहे. खारघर, नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या भव्य समागम सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात दाखल झालेल्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला.

या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसीलदार चैताली सावंत, कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी फारुक बागवान, नायब तहसीलदार प्रदीप पवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश हुक्केरी तसेच जिल्हास्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते.

चित्ररथांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुके, शहर व ग्रामीण भागांत जाऊन हिंद दी चादर या उपाधीने सन्मानित गुरू तेग बहादूर साहिब यांच्या त्याग, शौर्य, धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेच्या संदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. गुरु तेग बहादुर यांच्या कार्यावर आधारित ध्वनीचित्रफितीद्वारे समाजातील सर्व घटकांमध्ये जागृती निर्माण केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी सांगितले की, 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. चित्ररथ हे त्यातील महत्त्वाचे माध्यम असून, समाजात एकात्मता, बंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. समागम सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे. वाहतूक, निवास, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेबाबत नियमित आढावा बैठका घेऊन तयारीचे सूक्ष्म नियाजन केले जात आहे.  खारघर, नवी मुंबई येथे होणारा हा समागम सोहळा राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाणार असून, त्यासाठी विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत समागम सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हा  प्रशासनाकडून करण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या