महाडीबीटीवरील शिष्यवृत्ती अर्जांची महाविद्यालय स्तरावर दिरंगाई; Ø 3,054 अर्ज प्रलंबित

 


बुलढाणा, दि. 12 फेब्रुवारी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती व सहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना यांचा समावेश आहे.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अर्ज नोंदणीसाठी महाडीबीटी पोर्टल दिनांक 30 जून 2026 पासून माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालय स्तरावर तपासून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डच्या सद्यस्थितीनुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 10,917 अर्ज आजमितीस भरले गेले असून त्यापैकी 3,054 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. विभागाकडून वारंवार सूचना देऊनही काही महाविद्यालयांकडून अर्ज तपासणी व सादरीकरणास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत सामाजिक न्याय विभागाने संबंधित महाविद्यालयांना तातडीने प्रलंबित अर्जांची तपासणी पूर्ण करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पुढे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महाविद्यालयांनी आवश्यक ती तत्परता दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना