प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग खरेदी-विक्री संमेलन 7 मार्चला

 


 

बुलढाणा, दि. 27 (जिमाका) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभाग, बुलढाणा यांच्या वतीने शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जिजामाता प्रेक्षागृह येथे विशेष जिल्हास्तरीय खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या संमेलनाचा मुख्य उद्देश उत्पादक आणि खरेदीदार यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करणे हा आहे. जिल्ह्यातील वैयक्तिक लाभार्थी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक या संमेलनात सहभागी होणार आहेत. संमेलनात मसाले, धान्य प्रक्रिया उत्पादने, फळ-भाजीपाला प्रक्रिया पदार्थ, लोणची, पापड, चटण्या आणि बेकरी उत्पादनांचे स्टॉल्स उभारले जाणार असून स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.

 

कार्यक्रमादरम्यान तज्ज्ञांकडून ब्रँडिंग व आकर्षक पॅकेजिंग तंत्र, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) नोंदणी प्रक्रिया, बँक कर्ज सुविधा व शासन अनुदान, तसेच खरेदीदार-उत्पादक यांच्यातील व्यावसायिक करार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

स्थानिक उत्पादनांना व्यापक व जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक उद्योजक, विक्रेते व नागरिकांनी निर्धारित वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभाग, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या