छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा; जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी Ø “नाचून नव्हे, वाचून साजरी करा शिवजयंती”– डॉ. किरण पाटील

 








 

बुलढाणा (जिमाका),दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज सकाळी शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

 

यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी शिवजयंती वाचून साजरी करा, नाचून नाही असा संदेश देत शिवचरित्रातील आदर्श, शौर्य, सुशासन आणि स्वाभिमान यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास करून युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

 

यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील,  तहसीलदार विठ्ठल कुमरे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व शिवजयंती आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

पदयात्रेची सुरुवात जिजामाता क्रीडा संकुल येथून झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक, एसबीआय चौक मार्गे पुन्हा जिजामाता क्रीडा संकुल येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेत शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक-विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींच्या घोषणांनी आणि देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.

 

ही पदयात्रा जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, नगरपरिषद, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.पदयात्रेचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणे, युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट करणे हा होता.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या