नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षणाचे क्षेत्रकार्य सुरू; नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन

 

बुलढाणा, दि. 26 (जिमाका): भारत सरकारच्या अधिपत्याखालील राट्रीय सांख्यिकी ऑफिस (NSO) तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत आर्थिक व सांख्यिकी संचालनालय यांच्या वतीने नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey) पाहणीचे क्षेत्रकार्य जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत ग्रामीण व नागरी भागात राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणाची अचूक व परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक यांनी केले आहे.

या सर्वेक्षणाद्वारे देशातील श्रमशक्ती (Labour Force), लोकसंख्येच्या तुलनेत कामगारांचे प्रमाण, रोजगार व बेरोजगारीची संरचना, शिक्षण व तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांचे प्रमाण, शिक्षणातील गळती व त्याची कारणे, शेती व शेतीपूरक व्यवसाय, उत्पादन, व्यापार आणि सेवाक्षेत्रातील रोजगारस्थिती यांसंदर्भातील सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे.

कुटुंबांकडून संकलित होणाऱ्या माहितीचा प्रमुख उद्देश म्हणजे कामगार बाजारातील महत्त्वाचे निर्देशक तयार करणे. विशेषतः सध्याच्या साप्ताहिक स्थिती (CWS) नुसार कामगार शक्ती सहभाग दर (LFPR), कामगार लोकसंख्या प्रमाण (WPR) आणि बेरोजगारी दर (UR) यांसारख्या निर्देशांकांचे (Index) अंदाज तयार करण्यात येणार आहेत. या आकडेवारीचा उपयोग राज्य व केंद्र शासनाला धोरणनिर्मिती, योजना आखणी आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठी होणार आहे.

अमरावती विभागांतर्गत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये नमुना निवड पद्धतीने निवडलेल्या गावांतील व शहरांतील ठराविक वाड्यांमध्ये अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षण व रोजगारासंबंधी माहिती संकलित करणार आहेत. संकलित माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल. ही माहिती कोणत्याही इतर शासकीय किंवा खाजगी संस्थांकडे सोपविली जाणार नाही, अशी जबाबदारी अर्थ व सांख्यिकी संचालनालय स्तरावरून घेतली गेली आहे.

या पार्श्वभूमीवर, सर्वेक्षणासाठी घरी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना कुटुंबीयांनी श्रमशक्तीविषयक अचूक व परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने कळविले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या