कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे हळद प्रशिक्षण व परिसंवाद कार्यक्रम संपन्न

 

बुलढाणा, दि. 10 (जिमाका): कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी हळद प्रशिक्षण व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, मसाला पिके संचालनालय, कालिकत (केरळ) तसेच राष्ट्रीय फलोत्पादन योजना (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक–विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला होते. प्रमुख उपस्थितीत डॉ. अरविंद सोनकांबळे, अधिष्ठाता, उद्यानविद्या, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांचा समावेश होता. मार्गदर्शक म्हणून डॉ. विजय काळे, डॉ. श्याम घावडे, डॉ. अभय वाघ (भाजीपाला शास्त्र विभाग), डॉ. अजय सदावर्ते (कीटकशास्त्र विभाग), डॉ. अनिल तारू (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा), मंगेश जाधव (समन्वयक, ACABC, बुलढाणा) तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. विजय भुतेकर व स्वप्नील महाजन उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. अनिल तारू यांनी हळद पिकाखालील क्षेत्रवाढ, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य हे या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगून विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या हळद प्रात्यक्षिकांचे महत्त्व अधोरेखित केले.

तांत्रिक सत्रात डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी मसाला पिकांची सद्यस्थिती, बाजारपेठेतील संधी तसेच भारतीय संस्कृतीतील हळदीचे महत्त्व विशद केले. डॉ. विजय काळे यांनी आधुनिक हळद लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करताना २० मे ते १५ जून हा लागवडीसाठी योग्य कालावधी असल्याचे नमूद केले. डॉ. श्याम घावडे यांनी साठवणूक व विपणनावर भर देत बदलत्या हवामानात पीक फेरबदलाची गरज आणि ओवा, जिरे यांसारख्या पिकांची संधी सांगितली.

हळद काढणीपश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धनाबाबत डॉ. अभय वाघ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अजय सदावर्ते यांनी हळद पिकावरील हुमणी अळी व कंदमाशीच्या व्यवस्थापनासह एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनाची माहिती दिली. संतोष डाबरे यांनी हळद लागवड, प्रक्रिया उद्योग व विपणनात कृषी विभागाची भूमिका स्पष्ट केली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी हळद पिकाखालील क्षेत्रवाढीसाठी विद्यापीठाचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे सांगून आदर्श ग्राम संकल्पना व शेतकरी-शास्त्रज्ञ मंचासारख्या उपक्रमांतून शेती विकासाला चालना देत असल्याचे नमूद केले. नैसर्गिक शेतीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

हळद उत्पादक शेतकरी हरिभाऊ येवले, अजय माडोकार व विष्णू नागरे यांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ञ, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल तारू यांनी केले. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या