जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ अत्याधुनिक क्रीडा सुविधांमुळे बुलढाण्याचा नावलौकिक वाढणार – आमदार संजय गायकवाड

 





बुलढाणा, दि. ४ (जिमाका): दैनंदिन जीवनातील वाढता ताण-तणाव व मोबाईल-समाजमाध्यमांच्या अतिक्रमणामुळे खेळ व सांस्कृतिक परंपरा मागे पडत आहेत. अशा परिस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले. बुलढाणा शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक, इंडोर स्टेडियम व जलतरण तलाव उभारून क्रीडा क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ आज जिल्हा क्रीडा संकुल येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात होते.

यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त नवलकर, अधीक्षक हांडे, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, सतीश देशमुख, सौ. रिपिका खरात, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने, कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मंडोगडे यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

आमदार गायकवाड पुढे म्हणाले की, प्रशासकीय कामकाजातील ताण कमी करण्यासाठी खेळ व छंद जोपासणे आवश्यक आहे. सुदृढ शरीर आणि सशक्त मनासाठी अशा स्पर्धा प्रेरणादायी ठरतात. पंचांनी निष्पक्ष व वस्तुनिष्ठ निर्णय द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी शिस्त, सभ्य व क्रीडास्पृह वृत्तीने स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले व क्रीडा विकासासाठी आमदार गायकवाड यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. प्रास्ताविकात आयोजन समितीचे सचिव आशिष पवार यांनी ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या स्पर्धांची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन, दीप प्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण, क्रीडा ज्योत प्रज्वलन व खेळाडूंची शपथ घेण्यात आली. रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धांचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले.    00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या