छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरात कुष्ठरोग तपासणी व जनजागृती

 


बुलढाणा, दि. 16 (जिमाका): स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र(कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात कुष्ठरोग तपासणी व व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. शिबिरात उपस्थित नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आले.

कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे त्वचेवर फिक्कट पांढरे किंवा लालसर-तांबूस रंगाचे बधिर चट्टे, तेलकट व गुळगुळीत त्वचा, भुवयांचे केस विरळ होणे, हात-पायाला मुंग्या व बधिरता, बोटे वाकडी होणे, अंगावर गाठी येणे, मज्जाबाधा आणि कानाच्या पाळ्या जाड होणे. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी न घाबरता जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून  करण्यात आले आहे.

कुष्ठरोगाचे निदान झाल्यानंतर सहा महिने ते एक वर्ष बहुविध औषधोपचार (MDT) दिल्यास आजार पूर्णपणे बरा होतो. उपचार न घेतल्यास हात-पायाला जखमा व कायमस्वरूपी अपंगत्वाची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच कुष्ठरुग्ण आढळल्यास त्यांच्यासोबत उठणे-बसणे, खाणे-पिणे यामुळे संसर्ग होत नाही. कुष्ठरोग असंसर्गजन्य असून रुग्णांशी भेदभाव न करता सन्मानाने वागावे आणि मानसिक आधार द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले. सन 2027 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाच्या शासनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नागरिकांनी स्वेच्छेने तपासणी करून आरोग्य सेवेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या